Sunday, April 3, 2016

शिक्षणाची वारी..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र  
     🔷 (ATM)🔷

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या  महत्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत "शिक्षणाची वारी"या उपक्रमाचे आयोजन बालेवाडी पुणे येथे दि.२७/१/१६ ते दि.३१/१/१६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
विविध विषयांवरील नानाविध स्वरूपाचे 54 स्टॉल्स आपल्याला येथे पाहावयास मिळत आहेत.

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) ग्रुपच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.कविता बंडगर यांचा भाषा, गणित व भूगोल या विषयाचा स्टॉल येथे लावण्यात आला आहे.
---------------------
स्टॉल क्रमांक-29

🔷स्टॉल मध्ये सहभागी:🔷

१)सौ.कविता बंडगर मॅडम
२)सौ.ज्योती बेलवले
३)श्री.विक्रम अडसूळ
४)सौ.मनीषा पांढरे
५)श्री.उमेश कोटलवार

♦स्टॉल ची वैशिष्ट्ये:♦

👉१)मनोरंजक पद्धतीने भाषाध्यपन कसे करता येईल याचे मार्गदर्शन.

👉२)गणित विषयक आवड निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे खेळ घेऊन विषयात गोडी निर्माण करता येते याचे प्रात्यक्षिक.

👉३)रचनावादी पद्धतीने भाषा, गणित व भूगोल साहित्य कशापध्दतीने करता येईल याचे मार्गदर्शन.

👉४)टाकाऊ वस्तुंपासून सुलभ आणि उपयुक्त शैक्षणिक साहित्य कसे तयार करता येते याची माहिती.

👉५)विविध भाषाविषयक व गणितविषयक उपक्रम  कसे राबवता येतात याची माहिती दिली जात आहे.

👉६)वाचन, लेखन, गणन यावर आधारित भरपूर खेळ.

👉७)ABL तसेच रचनावादी पद्धतीने बनविलेले नानाविध प्रकारचे साहित्य.
याशिवाय बरच काही आपल्याला स्टॉल क्र.29 वर पाहायला मिळेल.

एकवेळ अवश्य भेट देऊन जाणून घ्या...

"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रास देण्या योगदान,
धडपडत्या Atm टीमचे कार्य महान"

धन्यवाद..!

✒✒✒शब्दांकन✒✒✒
         ज्योती दीपक बेलवले

🔷कृतिशील शिक्षक महाराष्ट्र(ATM)🔷

💐💐💐💐💐💐



ज्ञानरचनावाद राबवताना...

ज्ञानरचनावाद राबवताना.....


आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला दिसून येतो

सर्वात प्रथम रचनावाद म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे रचनावाद म्हणजे अस काही मोठ्ठ शास्त्र नाही की जे आपणाला वापरता येणारच नाही.रचनावादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेल्यास असे म्हणता येईल

✒बालकांना फुलण्यासाठी, आत्मविष्कारासाठी अनुकूल,पूरक परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय.

किंवा याहून सोपे


✒रचनावाद म्हणजे--कृतिशील स्वयंअध्ययन
यात सर्वात प्रथम स्वयंअध्ययन म्हणजे मुलं आपलं आपण शिकणार,ते त्याच स्वतः शिकणार शिक्षकाने फक्त शिकण्यास मदत करणे

आणि कृतिशील म्हणजे--
आता या कृतीशीलतेमध्ये
1)शारीरिक कृती
2)साधनं वापरून करावयाची कृती
3)वैचारिक पातळीवर जाण्यासाठी करावी लागणारी कृती
यांचा समावेश करता येईल

जर आपणाला या दोन गोष्टी समजल्या तर आपण रचनावाद चांगल्या प्रकारे राबवू शकतो असे मला वाटत

प्रत्येक शिक्षकाने सर्वात प्रथम हे जाणले पाहिजे कि आपण जे शिक्षण देणार आहोत ते  आपल्या वर्गातील मुलांच्या भावी काळासाठी असावं
आज आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे उद्या देशाचे नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांना योग्य असे व भावी काळासाठी किफायतशीर असेच शिक्षण दिले पाहिजे.
आज शिकणाऱ्या मुलांना त्यांचे पुढील भावी जीवन जगण्यासाठी व त्याच्या भावी काळासाठी फायद्याचं ठरणार शिक्षण आपण दिले पाहीजे

वर्गामध्ये अध्यापन करत असताना
एक सुलभक म्हणून शिक्षकाने मुलांच्या भावी काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत
त्याच बरोबर भावी काळातील गरजांचा विचार करणे गरजेचे असते
सध्याच्या वेगाने बदलत्या काळामध्ये टिकायचे असेल तर आज आपण दिलेले ज्ञान हे उद्याच्या पिढीच्या कामाला येणार असावं


आता सर्वात महत्वाच्या आणि मेंन मुद्द्याकडे आपण पाहूया


वर्गामध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवत असताना शिक्षकाने खालील गोष्टींचा विचार करावा.
🔷काय द्यायचं ?
🔷कसं द्यायचं ?
🔷किती द्यायचं ?
🔷गरजा नुसार त्यांना काय हवंय ?

रचनावाद प्रभावीपणे राबविण्यासाठी पुर्वज्ञान जागृत करुन त्याची सांगड नवीन ज्ञानाशी घडवून कृती केली पाहिजे.
आशयानुरुप कृती मुलांना दिल्यास मुले कृतीत रमतात..चुकतात..पुन्हा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळवतात त्यामुळे हे ज्ञान घोकंपट्टीयुक्त नसते.ते  ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.रचनावादात मुल स्वतः  विचार करतं.कृती करतं..व नवीन ज्ञानाची निर्मीती करते.

उदा...जैवविविधतेसाठी आपण
🐂🐟🐅🐄🐪🐫🐘 वेगवेगळे प्राणी व त्यातील फरक
एकच प्राणी व त्यातील फरक
उदा.मासा...🐋🐳🐬🐡🐟🐠

माशांची एकच जात व त्यातील फरक...यात आकार...रंग..इ.
बाबतची विविधता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे किंवा प्रत्यक्ष वस्तू दाखवून मुले त्यातील साम्य भेद निरीक्षणाने रचनावादात अभ्यासतात.

तसेच विविध संकल्पना समजण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन,त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण करून त्यांची उत्तरे त्यांनाच शोधण्यास प्रवृत्त करणे.

परंतु आजकाल फरशीवर आकृत्या काढल्या म्हणजे शाळेत रचनावादी शिक्षण दिलं जातं असा गोड गैरसमज आमच्या शिक्षक आणि अधिकारी यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो.
परंतु रचनावादी शिक्षणामध्ये मुलाकडे असणाऱ्या ज्ञानाची सांगड घालायची असते ,मुल आपलं आपण शिकत असत
उदा--मुलांना मापन येत असते
मूल शाळेत येण्याअगोदरच  विविध वस्तू ,नाणी -नोटा ,अंतर याचे मापन करत असते,गणितातील बेरीज शिकवत असताना त्याला एकक दशक संकल्पना स्पष्ट झाल्या की ते बेरीज अगदी सफाईदार पणे करते.
वर्गात मुलांना संपूर्ण स्वातंत्र दिले तर मुले चुकत चुकत शिकत असतात आणि वारंवार कृती केल्यामुळे मुलाने आत्मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकणारे असते
भाषा विषयाचा विचार करायला गेल्यास-------
मुलांना कोणतीही एक भाषा परिपूर्ण आली पाहिजे कारण मुलांचं 8 ते 10 वय हे भाषा शिकण्याचा काळ असतो असे मानसशास्त्र म्हणते आणि मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ही विचार करण्याची क्षमता विकसित करीत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे त्याला वेगवेगळ्या विषयावर कल्पना करायला चालना दिली पाहिजे मग तो विषय कोणताही असो.

उदा- दगडांचा पाऊस पडला तर....

आता तुम्ही म्हणाल हा असला कसला विषय ????
पण मुलांना कल्पना करू द्या
कारण मुलांच्या कल्पना ह्या रबरासारख्या असतात. जेवढ्या ताणाव्या तेवढ्या ताणल्या जातात.यामुळे त्याच्या भावविश्वाचा शोध घेता येतो,त्याच्या मनातील कल्पना समजण्यास मदत होते..


आपल्या वर्गामध्ये प्रभावी ज्ञानरचनावाद राबवत असतांना जर आपण मुलांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या कृती करू दिल्या पाहिजेत जेणेकरून मुल आपलं आपण शिकेल व व आपले अध्यापन ही रचनावादी होईल.


        विक्रम अडसूळ
     कर्जत अहमदनगर

ATM प्रथम वर्धापन दिन

आज 24 मार्च
याच दिवशी ATM ह्या रोपट्याचे बीज रोवले गेले सुरवातीला हे रोपटे इतक्या मोठ्या विशाल वृक्षात  विस्तारेल हे मनात देखील  आले नव्हते.

या एका वर्ष्याच्या प्रवासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकापर्यंत एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण जाऊ शकू हा विश्वासच बसत नाही
याचे सर्व श्रेय ATM मधील शिक्षक व अधिकारी याना जाते
आतापर्यंत प्रत्येकजण आपले बेस्ट इथे देण्याचा प्रयत्न करत आहे याचा मला अभिमान आहे

खर सांगतो खूप काही लिहायचं आहे पण आज का कुणास ठाऊक हात चालत नाहीत   नको त्यावेळी कितीही लिहितो पण आज अस का होतय कळेना

या यशामध्ये तुम्हा सर्वांचा सिहांचा वाटा आहे मी केवळ निमित्त आहे
हे वैभव जे आहे ते सर्व अपणामुळे आहे
मी एकटा काहीच करू शकत नाही
आणि एक गोष्ट मी नक्की शिकलो ती म्हणजे स्वतः साठी काही करू नये इतरांसाठी काम करत चला कारण तेच इतरांसाठी केलेलं काम कधी स्वतःच होऊन जात कळत ही नाही
याचे उत्तम उदा. म्हणजे सुरेश भारती,सुनील आलूरकर सोमनाथ वाळके ,ज्योती बेलवले,पौर्णिमा राणे,गौरी पाटीलउमेश कोटलवर,माऊली ,रणजीत डिसले,संदीप वाघचौरे,संतोष मुसळे,नदीम खान,आदरणीय तृप्ती ताई,किरण कुंवर मॅडम,जामदार मॅडम,कमळकर साहेब,वणवे साहेब,कडूस साहेब,विजय पवार साहेब,साबळे साहेब, मा.काळपांडे साहेब ,सर्व जिल्हा संयोजक आणि ग्रुप मधील सर्वच जण..

सर्वांच्या नावाचा उल्लेख करणे टाळतो(सम्पूर्ण ATM परिवारातील सदस्य)

प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात पारंगत आहे पण कधीही मी पणा आला नाही की गर्व आला नाही आणि हेच ATM च्या यशाचे गमक आहे असे मी म्हणतो.

पुन्हा एकदा विनम्र पणे या ठिकाणी कबूल करतो कि हे सर्व आपणा मुळे आहे मी फक्त निमित्त आहे.
हे यश आपणा सर्वांचे आहे
असेच सर्वजण या परिवारावर प्रेम कराल,एकमेकांचा आदर कराल आणि मनाचा मोठेपणा दाखवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो

याठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त केल्या आता काही मोजक्या प्रतिक्रिया या ठिकाणी मुद्दामहून शेअर करतो आवश्य वाचाव्यात
🙏🙏🙏🙏🙏🙏

शिक्षक सावकार झाला का ??

शिक्षक सावकार झाला का?

सध्या मीडियाला बातमीचा पुरवठा कमी झाला का? हा प्रश्न मनात येत आहे. आपल्या चॅनेल चा TRP वाढविण्यासाठी चॅनेल वर देण्यात आलेले शीर्षक 'शिक्षकांची सावकारकी' हे आपणास योग्य वाटते का? आधी झी 24 तास, काल ABP माझा आणि उद्या दुसरं  कोणी...चाललंय काय हेच कळायला मार्ग उरला नाही. कोणीही यावं आणि सरकारी शाळा आणि गुरुजींना बदनाम करावं. ABP माझाला माझे काही प्रश्न..

🔹लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडिया कडे पाहिले जाते. सर्वांचा यावर खूप विश्वास आहे. पण हाच मीडिया आता मास्तरचा 'मास्तरडा', 'सावकार' म्हणून उल्लेख करतो. यांच्या अशा वर्तणुकीमुळे यांच्यावर समाजाचा विश्वास राहील का?
एका शिक्षकाच्या वर्तणुकीवरून समस्त शिक्षकांची वर्तणूक तशीच असेल अशी कल्पना करून बातम्या प्रसिद्ध करणे हे पूर्णतः चुकीचे आहे.शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. खाजगी शाळातील मुलांची प्रवेश संख्या रोडावत आहे .हे दिसता क्षणी मीडिया आपला स्वार्थ साधण्यासाठी शिक्षकांवर आसूड उगवताना पाहायला मिळते.

🔹जी घटना घडली ती निंदनीय आहे त्याचे कुणीही समर्थन करत नाही पण एकामुळे आख्खे शिक्षक बदनाम का केले जातात?

🔹कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षक बदनाम करायचा समाजात नकारात्मक वातावरण तयार करायचे
आणि यांची ठरलेली खाजकीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करायची हा डाव यातून दिसतो.

🔹पुण्यातील काही शाळा टाटा प्रायोगीक तत्वावर चालवायला घेणार याला शिक्षकांनी विरोध सुरु केला होता आणि त्या विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी  या घटनेला मीडियाने मोठे केले नसेल कशावरून?

🔹एका बाजूला जि प शाळांचा दर्जा सुधारत असताना त्या शाळा आपली गुणवता सिद्ध  करत असताना आणि याचा परिणाम खाजगी शाळेतील विद्यार्थी जि प शाळेत यायला लागल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले व शिक्षकाला बदनाम केल्याशिवाय हे प्रमाण कमी होणार नाही कुटील डाव यामागे दिसतो.

🔹खाजकीकरण, उदारीकरण आणि भूमंडलीकरण यांच्या माध्यमातून या देशातील ठराविक लोकांनी येथील शेतकरी नेस्तनाबूत करण्याचे काम सुरु केले आहे,SEZ च्या माध्यमातून शेती गिळंकृत करण्याचे काम चालू आहे हे मीडियाला दिसत नाही का
आम्ही झालेल्या घटनेचा विरोधच करतो..
पण या प्रकरणातून शिक्षकांना बदनाम करणे हाच उद्देश स्पष्ट होतो.

🔹जे कोणी सावकारकी करत आहेत त्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत  सोलून काढले पाहिजे या मताचे आम्ही ही आहोत कारण आम्ही शिक्षक असलो म्हणून काय झाले आधी आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत हे आम्ही विसरलेलो नाही.
त्यामुळे ज्या उस्मानाबाद मधील शिक्षकाने सावकारकी केली त्याला सजा झालीच पाहिजे पण इतर शिक्षकांना बदनाम का केले जाते हे सर्व समाज जाणू शकतो.

🔹खाजगीकरणाच उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळा आणि शिक्षक याला बदनाम करण्याचं मिडियाच षडयंत्र लोकशाहीला हानिकारक आहे.

🔹मीडिया शिक्षकांची काम का दाखवित नाही? फंड काढून शाळा सुदृढ करणारे शिक्षक का दाखवित नाही? दुष्काळी मदत निधी देणारा शिक्षक का दाखवित नाही? रानोरान फिरून गुणवत्ता जोपासणारा शिक्षक का दाखवित नाही? एक शिक्षक सावकरकी करतोय म्हणून सर्वच करतायत हे समाजमनावर बिंबवणे हा लाजिरवाणा प्रकार दिसतो.

🔹'शितावरून भाताची परिक्षा' अस जर आपण म्हणत असाल तर ते साफ चुकीचं होईल.
निवडणूक काळात पेड न्युज प्रकरणे चालतात..त्यावरून आम्ही पण तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहायचं का?
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे पहिले जाते त्यामुळे आपण व्यक्त होताना किंवा एखाद्याला बदनाम करताना काळजी घ्या.

🔹इतर क्षेत्रातील लोकही पगार घेतात.तो आपल्याला दिसत नाही फक्त शिक्षकांचा तेवढाच दिसतो.समाज घडविण्यात शिक्षकाचा मोठा हात आहे हे आपण विसरलात वाटत.

🔹शिक्षकांचा पगार तेवढाच दिसतो त्याला काय काम असतात यावर आपण कधी बोलत नाही. बोलणं सोप असत करणे खूप अवघड.. जाणून घ्यायचं असेल तर कधी शाळेत प्रत्यक्ष या आणि बघा सर्व गुरुजी तुम्हाला जीवाचं रान करून काम करताना आढळतील.

🔹डाळीत किंवा तांदळात एखादा खडा असेल तर आपण ती डाळ वा तांदूळ फेकून देत नाही त्यावरून त्याची गुणवत्ता ठरवत नाही त्यामुळे एखाद्या शिक्षकाच्या वर्तणुकीवरून सर्व एक जैसे आपण कस काय म्हणू शकता?

तेव्हा समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास तसाच राहावा अस वाटत असेल तर समाजाची दिशाभूल करणे थांबवा.आपल्याकडे समाज खूप आदराने पाहतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण तो विश्वास सार्थ ठरविला पाहिजे अस मला वाटत. तेव्हा शिक्षण क्षेत्राला बदनाम करून स्वतःच पोट भरवणे थांबवा. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या बाबी लोकांसमोर मांडा लोक स्वागत करतील.

            विक्रम अडसूळ
               संयोजक
    कृतिशील शिक्षक महाराष्ट्र  
              (ATM)

वाड्यावस्त्यावरील शिक्षण संपणार..

"वाडयावस्त्यावरील शिक्षण  संपणार"
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दि २१/०२/२०१६ रोजी शिक्षण आयुक्तालयाने एका पत्राद्वारे महाराष्ट्रामध्ये 20 पटाच्या आतमध्ये असणाऱ्या शाळांची माहिती मागितली आहे.त्यामध्ये सरळ सरळ उल्लेख केला आहे की 20 पटाच्या आतील शाळांमध्ये मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहे तसेच सदर  शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजन करण्याच्या दृष्टीने माहिती संकलनाचे काम संपूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये शाळा अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत. आताकुठे त्या शाळांवरील छप्पर बाजूला होऊन,कुडाच्या भिंती बाजूला होऊन पक्क्या बांधकामाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. .संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी शाळा कात टाकत आहेत आणि अशातच जर त्या शाळा बंद झाल्या तर पुन्हा ही पिढी शिक्षणापासून दूर राहिल्याशिवाय राहणार नाही. शासन या शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे कारण अश्या कमी पट असणाऱ्या शाळांवर खर्च होतो असे म्हटले जाते .
पण आपण जर खालील गोष्टींवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल कि शासनाचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो.

🔶20 पटाच्या आतील शाळा बंद करण्यापूर्वी ग्रामीण महाराष्ट्र आणि तेथील भौगोलिक आणि सामाजिक स्थिती जाणून घेणे गरजेचे वाटते
आजही काही गावांपर्यंत जायला साधा रस्ता देखील नाही अश्या ठिकाणी काय वाहतुकीची सोय केली जाऊ शकते ?आजही बरीच गावे केवळ नदी, नाला यावरील पुलांअभावी एकमेकांच्या संपर्कात नाहीत

🔶कोकण किनारपट्टी ,प.महाराष्ट्राचा डोंगरी भाग आणि वनक्षेत्र या भागातील गावांची, तांड्यांची ,वाड्यावस्त्याची लोकसंख्याच मुळात कमी आहे तिथे पट कमी असणारच
मग त्या ठिकाणच्या शाळा बंद करून आपण त्याठिकाणचा शैक्षणिक वारसा बंद करणार आहोत काय ?
🔶अशी बरीच गावे आहेत त्याच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरात दुसरे गाव नाही अश्या ठिकाणच्या शाळा बंद करून एक प्रकारे तेथील शिक्षणाचा वारसाच संपल्याशिवाय राहणार नाही
🔶1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ही असे स्पष्ट आहे की प्रत्येक प्राथमिक शाळेत किमान दोन शिक्षक असतील व लवकरच प्रत्येक वर्गासाठी एक शिक्षक दिला जाईल
पण ते मिळने सोडून द्या ,आहे त्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत दिसत आहे

🔶वय वर्ष 6 ते 10 हे वय जरी गृहीत धरले तर या वयात त्या बालकांना आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या माणसाची आवश्यकता असते तिथे RTE नुसार 30 पटास एक शिक्षक मान्य असून तो देखील आता पर्यंत मिळाला नाही तर ज्या ठिकाणी मुलं स्वतः शिकू शकतात अश्या वयातील मुलांना भरमसाठ प्रा.शिक्षकांचा भरणा केलेला दिसतो

🔶आतायापर्यंत जेवढ्या फिरत्या योजना शासनाने राबविल्या आहेत त्याच्या उडालेल्या फज्याचे आपण साक्षीदार आहोत त्यामुळे यावर वेळीच आपल्यासारख्या विचारी लोकांनी विचार करण्याची आता वेळ आली आहे

🔶गावात ,वस्ती, वाडी ,पाडा, तांड्यावर शाळा असल्यामुळे शिक्षणाचे एक वातावरण गावात निर्माण होत असते ते या निर्णयामुळे नष्ट होऊन शैक्षणिक वारसा नष्ट होईल
🔶या सर्व योजने मध्ये मुलींच्या सुरक्षेची हमी कोण घेणार

🔷 सरकारची अशी कितीतरी खाती आहेत ज्याठिकाणी अमाप खर्च केला जातो .
🔷एकाच कामासाठी दोनदा निधी मंजूर केला जातो .
🔷कोण म्हणते की 20 पटाच्या आतील शाळात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात नाही किंवा मिळत नाही.
🔷माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र  शिक्षण विभाग कुमठे बीट ला मॉडेल मानत आहे तेथील बऱ्याच शाळा या 20 पटाच्या आतील आहेत .
🔷मोठया शाळेत गेल्यावर गुणवत्ता पूर्ण शिक्षण सर्वच मुलांना मिळेल यात शंका निर्माण होते.तसेच या समायोजित केलेल्या मुलांची  फलश्रुती  होईलच यात शंका निर्माण होते.
🔷मुलांना त्या समायोजन केलेल्या शाळेपर्यंत जाण्यासठी वाहतूक व्यवस्था केली जाईल असे समजते,पण ...
🔷काही शाळा अश्या आहेत मुळातच या शाळेपर्यंत यायला सध्याची मुले एक ते दीड किलोमीटर वरून चालत येतात
🔷शासन खर्च करून या सर्व मुलांपर्यंत पोहचून त्या मुलांना शाळेत दाखल करू शकेल काय आणि केलच तर त्यांची दैनंदिन उपस्थिती टिकवू शकेल काय ?
🔷शासनाने जर 20 पटाच्या आतील शाळा बंद केल्या तर शाळा बाह्य मुले वाढतील तसेच शिक्षक हि अतिरिक होतील
       या सर्व गोष्टींचा विचार केल्यास असे वाटते की वाड्या वस्त्यांवरील मुलांची शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढल्यास नवल वाटायला नको.आता या विषयावर सर्व संघटनांनी एकत्र येवून ठोस निर्णय घेवून शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रती आपली भूमिका बजावली पाहिजे .तसेच आपला सामाजिक वारसा जपला पाहिजे .या निर्णयामुळे कितीतरी शिक्षक बांधव अतिरिक्त होणार आहेत त्यांचे व्यवस्थापन कसे केले जाईल हा प्रश्न असेल
       शासनाने दि.२१/०२/२०१६ च्या पत्रात शाळा बंद करा असा आदेश दिलेला नाही परंतु माहिती संकलन करणे ही शाळा बंद करण्याची पहिली पायरी असू शकते म्हणून या विषयावर स्पष्ट बोलता येत नाही परंतु  20 पटाच्या आतील शाळा बंद करण्याच्या निर्णयाला कृतीशील शिक्षक महाराष्ट्र ( Active Teachers Maharshtra ) संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाला 2 मार्च 2016 रोजी निवेदन देऊन 20 पटाच्या आतील शाळा बंद करू नयेत अशी विनंती करणार आहे जर आपना कोणाला या कार्यासाठी सहकार्य करायचे असेल तर

atmaharashtra@gmail.com

या मेलवर मेल करून आपले सहकार्य देऊ शकता



विक्रम अडसुळ
कर्जत अहमदनगर ,

      संयोजक
Active Teachers Maharashtra

🌺🌺🌺🌺🌺

गुणगौरव सोहळा

🌹गुणगौरव पुरस्कार सोहळा🌹

दि 11जानेवारी 2016 रोजी
पुणे येथे साई फौंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा "स्वामी विवेकानंद राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार" सोहळा काल मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या सभागृहामध्ये जेष्ठ कवी व 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष आदरणीय फ मु शिंदे,मा संजयजी कोकरे,आमदार जगदीश मुळीक,इतिहास संशोधक भा ल ठाणगे,भूषणकुमार उपाध्याय(अ पो महासंचालक)चित्रपट अभिनेते शशिकांत खानविलकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
     विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले
यामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात आले यामध्ये
🔷सुरेश भारती
🔷सुनील आलूरकर
🔷ज्योती दीपक बेलवले
🔷मनीषा जराड (काटे)
🔷विक्रम अडसूळ
🔷ज्ञानदेव नवसरे

या ATM सदस्यांचा समावेश होता
कार्यक्रम फारच सुरेख व आनंददायी वातावरणात पार पडला
हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील ATM सदस्य उपस्थित होते .यामध्ये
संतोष शिंदे (सातारा),डॉ.नागनाथ येवले(सोलापूर),सदानंद डोंगरे(अहमदनगर),स्वातीताई भालशंकर(पुणे),सुनीताताई काटम(दौंड),तौसिफ परवेज(पुणे),
प्रीती खांडेलवाल(पुणे) स्वेताताई संख्ये(मुंबई),डॉ रामदास काटे (बारामती)
हे ATM सदस्य उपस्थित होते

कार्यक्रमातून फारच सकारात्मक ऊर्जा मिळाली
पुनश्च एकदा सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
      संकलन
    संतोष शिंदे (सातारा)



कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल