Saturday, July 11, 2015

रणजीत डिसले

रणजीत डिसले याने केले ट्यूटर मॉडल विकसित👉👉👉👉👉 'बालभारती'च्या पाठ्यपुस्तकांमधील धडे- कवितांना मोबाइल तंत्रज्ञानाची जोड देत रणजितसिंह डिसले या प्राथमिक शिक्षकाने पालकांसाठी 'ट्युटर मॉडेल' विकसित केले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये चिकटवलेल्या क्यूआर कोडच्या आधारे विकसित या ट्युटरच्या माध्यमातून कवितांच्या चाली, धड्यांवरचा स्वाध्याय, अभ्यास करण्यासाठीच्या सूचना आदी बाबी थेट मोबाईलवरच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुला-मुलींचा अभ्यास घेण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पालकांच्या हातात आली आहे. पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सहज सोपे व्हावे आणि मोबाइल फोनच्या प्रभावी वापरातून विद्यार्थी- पालक- शिक्षक हे नाते अधिक चांगल्या पद्धतीने विकसित व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डिसले यांनी हे तंत्र विकसित केले आहे. डिसले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक असून, विद्यार्थी आणि पालकांची नेमकी गरज लक्षात घेत हे तंत्र विकसित केल्याचे त्यांनी शुक्रवारी 'मटा'ला सांगितले. 'शाळेतून घरी आलेल्या आपल्या पाल्याचा अभ्यास पालकांना सहजतेने घेता यावा, यासाठी हे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी प्रत्येक धड्यासाठी एक विशिष्ट क्यूआर कोड स्टिकर चिकटवला आहे. पालकांनी आपल्या स्मार्टफोनवरून हा कोड स्कॅन केला, की त्या पाठाशी वा कवितेशी संबंधित माहिती त्यांच्या मोबाइलवर उपलब्ध होते. कवितेचा अभ्यास घेण्यासाठी कवितेची चाल, चित्ररूप धडा असल्यास तो धडा आणि त्यातून अपेक्षित असलेला संदेश देणारा व्हिडिओ, कविता आणि धड्यांशी निगडित स्वाध्याय, ऑनलाइन प्रश्नपत्रिका अशी सर्व माहिती या तंत्राद्वारे पालकांना मोबाइलवर उपलब्ध करून दिली जात आहे,' असे डिसले यांनी सांगितले. सध्या या तंत्राच्या आधारे पहिलीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय उपलब्ध झाले आहे. तसेच, येत्या काही दिवसात पहिली ते चौथीच्या सर्व विषयांसाठी असे स्वाध्याय उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धोरणात्मक पातळीवर या तंत्राचा विचार झाल्यास राज्यभरात सर्वत्र विद्यार्थ्यांना हे तंत्र वापरणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना लाभ मुळात एमए, एमएड असलेल्या आणि तंत्रशिक्षणाची तशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या डिसले यांनी हे तंत्र विकसित करण्यासाठी गुगल ड्राइव्ह आणि गुगल फॉर्म वापरून डेटाबेस तयार केला आहे. सध्या परितेवाडी, अकुंभे, वरवडे, वेणेगाव आणि होळे या गावांमधील पाच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी हे तंत्र उपलब्ध करून दिले आहे. या शाळांमधील २४४ विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे तंत्र वापरत आहे. या तंत्राद्वारे आपल्या पाल्याची ऑनलाइन परीक्षा घेणे आणि त्यांचे लगेच मूल्यमापन करणेही शक्य झाल्याने पालकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डिसले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल