Sunday, April 3, 2016

शिक्षक सावकार झाला का ??

शिक्षक सावकार झाला का?

सध्या मीडियाला बातमीचा पुरवठा कमी झाला का? हा प्रश्न मनात येत आहे. आपल्या चॅनेल चा TRP वाढविण्यासाठी चॅनेल वर देण्यात आलेले शीर्षक 'शिक्षकांची सावकारकी' हे आपणास योग्य वाटते का? आधी झी 24 तास, काल ABP माझा आणि उद्या दुसरं  कोणी...चाललंय काय हेच कळायला मार्ग उरला नाही. कोणीही यावं आणि सरकारी शाळा आणि गुरुजींना बदनाम करावं. ABP माझाला माझे काही प्रश्न..

🔹लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडिया कडे पाहिले जाते. सर्वांचा यावर खूप विश्वास आहे. पण हाच मीडिया आता मास्तरचा 'मास्तरडा', 'सावकार' म्हणून उल्लेख करतो. यांच्या अशा वर्तणुकीमुळे यांच्यावर समाजाचा विश्वास राहील का?
एका शिक्षकाच्या वर्तणुकीवरून समस्त शिक्षकांची वर्तणूक तशीच असेल अशी कल्पना करून बातम्या प्रसिद्ध करणे हे पूर्णतः चुकीचे आहे.शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. खाजगी शाळातील मुलांची प्रवेश संख्या रोडावत आहे .हे दिसता क्षणी मीडिया आपला स्वार्थ साधण्यासाठी शिक्षकांवर आसूड उगवताना पाहायला मिळते.

🔹जी घटना घडली ती निंदनीय आहे त्याचे कुणीही समर्थन करत नाही पण एकामुळे आख्खे शिक्षक बदनाम का केले जातात?

🔹कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षक बदनाम करायचा समाजात नकारात्मक वातावरण तयार करायचे
आणि यांची ठरलेली खाजकीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करायची हा डाव यातून दिसतो.

🔹पुण्यातील काही शाळा टाटा प्रायोगीक तत्वावर चालवायला घेणार याला शिक्षकांनी विरोध सुरु केला होता आणि त्या विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी  या घटनेला मीडियाने मोठे केले नसेल कशावरून?

🔹एका बाजूला जि प शाळांचा दर्जा सुधारत असताना त्या शाळा आपली गुणवता सिद्ध  करत असताना आणि याचा परिणाम खाजगी शाळेतील विद्यार्थी जि प शाळेत यायला लागल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले व शिक्षकाला बदनाम केल्याशिवाय हे प्रमाण कमी होणार नाही कुटील डाव यामागे दिसतो.

🔹खाजकीकरण, उदारीकरण आणि भूमंडलीकरण यांच्या माध्यमातून या देशातील ठराविक लोकांनी येथील शेतकरी नेस्तनाबूत करण्याचे काम सुरु केले आहे,SEZ च्या माध्यमातून शेती गिळंकृत करण्याचे काम चालू आहे हे मीडियाला दिसत नाही का
आम्ही झालेल्या घटनेचा विरोधच करतो..
पण या प्रकरणातून शिक्षकांना बदनाम करणे हाच उद्देश स्पष्ट होतो.

🔹जे कोणी सावकारकी करत आहेत त्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत  सोलून काढले पाहिजे या मताचे आम्ही ही आहोत कारण आम्ही शिक्षक असलो म्हणून काय झाले आधी आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत हे आम्ही विसरलेलो नाही.
त्यामुळे ज्या उस्मानाबाद मधील शिक्षकाने सावकारकी केली त्याला सजा झालीच पाहिजे पण इतर शिक्षकांना बदनाम का केले जाते हे सर्व समाज जाणू शकतो.

🔹खाजगीकरणाच उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळा आणि शिक्षक याला बदनाम करण्याचं मिडियाच षडयंत्र लोकशाहीला हानिकारक आहे.

🔹मीडिया शिक्षकांची काम का दाखवित नाही? फंड काढून शाळा सुदृढ करणारे शिक्षक का दाखवित नाही? दुष्काळी मदत निधी देणारा शिक्षक का दाखवित नाही? रानोरान फिरून गुणवत्ता जोपासणारा शिक्षक का दाखवित नाही? एक शिक्षक सावकरकी करतोय म्हणून सर्वच करतायत हे समाजमनावर बिंबवणे हा लाजिरवाणा प्रकार दिसतो.

🔹'शितावरून भाताची परिक्षा' अस जर आपण म्हणत असाल तर ते साफ चुकीचं होईल.
निवडणूक काळात पेड न्युज प्रकरणे चालतात..त्यावरून आम्ही पण तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहायचं का?
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे पहिले जाते त्यामुळे आपण व्यक्त होताना किंवा एखाद्याला बदनाम करताना काळजी घ्या.

🔹इतर क्षेत्रातील लोकही पगार घेतात.तो आपल्याला दिसत नाही फक्त शिक्षकांचा तेवढाच दिसतो.समाज घडविण्यात शिक्षकाचा मोठा हात आहे हे आपण विसरलात वाटत.

🔹शिक्षकांचा पगार तेवढाच दिसतो त्याला काय काम असतात यावर आपण कधी बोलत नाही. बोलणं सोप असत करणे खूप अवघड.. जाणून घ्यायचं असेल तर कधी शाळेत प्रत्यक्ष या आणि बघा सर्व गुरुजी तुम्हाला जीवाचं रान करून काम करताना आढळतील.

🔹डाळीत किंवा तांदळात एखादा खडा असेल तर आपण ती डाळ वा तांदूळ फेकून देत नाही त्यावरून त्याची गुणवत्ता ठरवत नाही त्यामुळे एखाद्या शिक्षकाच्या वर्तणुकीवरून सर्व एक जैसे आपण कस काय म्हणू शकता?

तेव्हा समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास तसाच राहावा अस वाटत असेल तर समाजाची दिशाभूल करणे थांबवा.आपल्याकडे समाज खूप आदराने पाहतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण तो विश्वास सार्थ ठरविला पाहिजे अस मला वाटत. तेव्हा शिक्षण क्षेत्राला बदनाम करून स्वतःच पोट भरवणे थांबवा. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या बाबी लोकांसमोर मांडा लोक स्वागत करतील.

            विक्रम अडसूळ
               संयोजक
    कृतिशील शिक्षक महाराष्ट्र  
              (ATM)

No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल